ही निवडणूक रणजितसिंह निंबाळकर – धैर्यशील मोहिते पाटील व राम सातपुते – प्रणिती शिंदे यांच्यातील नव्हे. ही काही ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा विधानसभेची नव्हे, तर देशाचा नेता, पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे.
त्यामुळे विकासपुरुष नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यातील ही निवडणूक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूर मतदारसंघातील आमदार राम सातपुते यांनी अर्ज दाखल केल्यानंतर चार पुतळा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी हे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन आहेत. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदींचे डबे आहेत. त्यात दीनदलित, गोरगरीब, ओबीसी, अल्पसंख्याक, आदिवासी, महिलांना जागा आहे.
मात्र, विरोधकांकडे २६ पक्ष असून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, स्टॅलिन हे सर्वजण आम्हीच इंजिन असल्याचे म्हणतात. त्यांच्याकडे डबेच नसल्याने सामान्यांना जागा नाही.
त्यात त्यांचा परिवार बसणार आहे. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या कन्येला त्यात बसवणार आहेत. आमचे दोन्ही उमेदवार सक्षम असून त्यांना मत म्हणजे मोदींना मत मिळणार आहे.
देशाचा विकास केवळ मोदीच करू शकतात, त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे सांगत फडणवीस यांनी विविध योजनांतून देशातील कोट्यवधी जनतेला मिळालेल्या लाभाची जंत्रीच सांगितली.
त्यामुळे कोट्यवधी लाभार्थ्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने नरेंद्र मोदी यांचे काहीही वाकडे होणार नाही, असा विरोधकांना इशारा दिला. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी खर्च व्हायचा. मोदींनी त्यासाठी १३ लाख कोटी दिले.
कोणालाही समर्थन द्या, तरीही मोदींना मते पक्ष न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील कामगारांसाठी ३० हजार घरे दिली. मात्र, त्यांनी समर्थन दुसऱ्यांना दिले.
त्यांनी कोणालाही समर्थन दिले तरी घरे कोणी दिली, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना मते देतील, असा विश्वास फडणवीस यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांचा उल्लेख न करता व्यक्त केला.