पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलगा भरधाव वेगानं कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता. या ‘हिट अँड रन’ प्रकरणामुळं सध्या पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
पण या भीषण अपघातानंतर आरोपीला दोन तासांतच जामीन मिळाला होता. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळं पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करायला हवं. त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. या भीषण अपघातात एक तरुण आणि तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतरही केवळ दोनच तासांत आरोपीला जामीन मंजूर झाला.
यानंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात आरोपी मुलगा बारमध्ये बसून दारु पिताना दिसतो आहे. पण त्याचा मेडिकल रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे म्हणजेच त्यांनं मद्य सेवन केलेलं नाही, असं यामध्ये म्हटलं आहे.
त्यामुळं या प्रकरणात आरोपीला कोण मदत करतंय? हे पोलीस आयुक्त कोण आहेत? त्यांना तातडीनं पदावरुन हटवायला हवं अन्यथा पुणेकर रस्त्यावर उतरतील.