कल्याणीनगर येथे आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणातील अल्पयवीन कारचालक मुलाला बालन्याय मंडळाने सुनावलेला आदेश हा आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. ही भूमिका नागरिक आणि प्रशासनाच्या मनात प्रश्न निर्माण करणारी आहे.
अपघाताचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत लोकांच्या तीव्र संतापजनक प्रतिक्रिया आहेत. पोलिसांनी सुरूवातीपासूनच याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आता देखील पोलीस या प्रकरणात जेथेपर्यंत जावे लागेल, तेथेर्यंत जातील असा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.
फडणवीस हे मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. शहरातील बांधकाम व्यावयायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पयवीन मुलाने अलिशान पोर्शे कार मद्यधुंद अवस्थेत चालवत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा आयटी अभियंतांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाची गृहमंत्री फडणवीस यांनी माहिती घेतली. आतापर्यंत याबाबत काय घडले, पुढे काय करणे गरजेचे आहे, अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपायोजन करण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा केली.
फडणवीस म्हणाले, “निर्भया प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींना तो सज्ञान असल्यासारखे गृहीत धरून त्या नियमाप्रमाणे कारवाई करावी. अशी मागणी बालन्याय मंडळासमोर पोलिसांनी या अपघात प्रकरणात केली होती. तसेच भा.दं.वि कलम 304 सारखे कलम लावण्यात आले होते.
मात्र, दुर्देवाने बालन्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली. याबाबत पुढे निर्णय घेऊ म्हणून थांबले. त्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला.” “पोलिसांना हा एक प्रकारचा धक्का होता. यामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे पोलिसांनी याबाबत सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला.
मात्र त्यांनी सांगितले की, याबाबत फेरविचार करण्याचा अधिकार बालन्याय मंडळास आहे. त्यामुळे तुम्ही परत त्यांच्याकडे जा. जर त्यांनी याबाबत निर्णय दिला नाही, तर तुम्ही आमच्याकडे परत अर्ज दाखल करू शकता.
आज किंवा उद्या याबाबत बालन्याय मंडळाकडून निर्णय येणे अपेक्षित आहे. पोलिसांनी हा प्रकार अतिशय गंभीर घेतला आहे. न्याय मिळेपर्यंत न्यायालयात पोलीस दाद मागतील.’