मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला 6 जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच जातीयवाद न करण्याची जबाबदारी एकट्या मराठा समाजाची नाही.
सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्हाला सत्तेत घुसावे लागेल. एकदा सत्ता काबीज झाली की मग सगळ्या गोष्टी आपोआप होतील, असे ते सरकारला इशारा देत म्हणाले आहेत.
प्रकृती बिघडल्यामुळे जरांगे यांना काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवाली सराटी या आपल्या गावाकडे गेले.
तत्पूर्वी, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे 6 जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी केली. तसेच 4 जून रोजी आपले उपोषण होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
मी साडेतीन महिन्यांपूर्वी 4 जून रोजी उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार माझे उपोषण होईल. त्यात कोणताही बदल होणार नाही.
मराठा व कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करायचा, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करायची, गुन्हे मागे घ्यायचे, शिंदे समितीची कार्यकाळ आणखी 1 वर्ष वाढवायचा या आमच्या मुख्य मागण्या आहेत.
आम्ही कोणतीही नवी मागणी केली नाही. त्याम्ळे सरकारने 6 जूनपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा आम्ही आंदोलन बंद करणार नाही. या प्रकरणी कठोर आमरण उपोषण होणार, असे जरांगे म्हणाले.
डिवचणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका लोकसभा निवडणुकीत कोण पडले व कोण जिंकले यात आम्हाला कोणताही रस नाही. आमच्यासाठी आरक्षणाच्या गुलाल मोठा आहे. आम्हाला बाकी कशातच आनंद नाही. मराठा समाजाने मुद्दामपणे डिवचणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये.