पंढरपूर | दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल,

Photo of author

By Sandhya


पंढरपूर : दिनांक 4 जानेवारी रोजी कुणाल दिपक घरत, रा. बिलाल पाडा, नाला सोपार पुर्व, ता. वसई जि. पालघर हे भाविक आपल्या कुंटुंबासह सकाळी 11 वाजता वा त्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दर्शनाकरीता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून 11000 रुपये घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली

संबंधित भाविक हे लवकर दर्शन घेणे कामी मंदिर परिसरात विचारपूस करीत असताना, मंदिरा जवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरीता किमान 7-8 तास लागतील असे सांगितले, दर्शनाकरीता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करीत असताना, चिंतामणी ऊर्फ मुकुंद मोहन उत्पात, पंढरपूर या इसमाने मी मंदिरात पुजारी आहे, तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवुन आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील, 5001/- रूपये ची मंदिर समितीची पावती देतो व 6000/- रूपये मला वर द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम रुपये 11000 स्वीकारले. त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जावून 5001/- रूपये ची भाविकाच्या नावे देणगी पावती करून, संबंधित भाविकाला दिली. त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असताना तेथील पोलीस अधिकारी सपोनि नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता, देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित उत्पात नावाच्या इसमावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम 318 (3) (4) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, श्रींचे दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णत: निशुल्क आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्री चे पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. तसेच याबाबत अगोदर अनेकवेळा व आज सकाळी देखील समाज माध्यमाद्वारे त्यांनी आवाहन केले आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page