चाकण :
पाण्याचे पाईप लिकेज होऊन त्याठिकाणी चिखल झाल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. करंजविहिरे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंद्रायणी राईस मिलचे जवळ हा प्रकार घडला. या राड्यात एका ६३ वर्षीय वृद्धास बेदम मारहाण करण्यात आली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
अशोक दत्तू तुळवे (वय – ६३, रा. कल्याण, मुंबई) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रीतम अनंत जाधव, अर्चना अनंत जाधव, अनंत सिताराम जाधव, प्रसाद बाळू मरगज, अभिषेक बाळू मरगज ( सर्व रा. करंजविहीरे, पाईट रोड, ता. खेड) यांच्यासह त्यांचे पाच साथीदार ( नाव व पत्ता निष्पन्न नाही.) अशा एकूण दहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक तुळवे यांच्या जागेतून जाणारा पाण्याचा पाईप लिकेज होऊन चिखल झाला होता. त्यामुळे फिर्यादी अशोक तुळवे यांनी तो पाईप दुरुस्त करून घ्या, असे प्रीतम अनंत शिंदे यांना सांगितले. यावरून चिडलेल्या वरील आरोपींनी संगणमत करून फिर्यादी अशोक यांना जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने जबर मारहाण केली. तसेच फिर्यादी अशोक यांच्या दोन्ही मुलांनाही हाताने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी अशोक हे साक्षीदार यांच्यासोबत प्रीतम जाधव यांच्याविरुद्ध महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास जात होते. त्या कारणावरून पुन्हा चिडून प्रीतम जाधव याचे वडील अनंत सिताराम जाधव यांनी व उर्वरित आरोपींनी बेकायदा जमाव करून फिर्यादी अशोक यांची रिक्षा अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत हाताने व लाथा बुक्क्यांनी पुन्हा जबर मारहाण केली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी अशोक तुळवे यांच्या फिर्यादीवरून वरील दहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तुळवे यांच्या गटाविरोधातही करंजविहीरे येथील एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.