अंबादास दानवे : वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही

Photo of author

By Sandhya

अंबादास दानवे

सरकारने २०२२- २३ या काळात एक रुपयांचीही औषधे खरेदी केली नसल्याने राज्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला.

हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाला २०२२- २३ मध्ये १०८ कोटी रुपयांचे औषध खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यातील फक्त ५० कोटीचं रुपये हाफकीनला देण्यात आले आहेत.

यामुळे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय कोणत्याच कंपनीची औषधे खरेदी करणार नाही, अशी भूमिका हाफकीन संस्थेने घेतल्याची माहिती हाफकीन च्या अधिकारी वर्गासोबत घेतलेल्या बैठकीत मिळाली, असेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकार दीडशे कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करते. मात्र औषध खरेदीसाठी पैसे देत नाही. ‘सरकार आपल्या दारी’ च्या माध्यमातून मृत्यू घरोघरी पाठवते की काय?

असा सवालही दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी झालेल्या नेमणुकीला दानवे यांनी आक्षेप घेतला आहे.

ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होतो व त्याच्या विरोधात नोटीस काढूनही सरकारला जुमानत नाही अशा अधिकाऱ्याच्या हाती राज्याची कायदा व सुव्यवस्था जाता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी, यासाठी या आठवड्यभरात विमा कंपन्यांच्या दारात जाऊन जाब विचारणार असून अशी भूमिका शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतली असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली.

Leave a Comment