Accused who robbed a couple by stabbing them with a knife is finally ‘arrested’

Photo of author

By Sandhya

कोयत्याचा वार करत प्रेमी युगलाला लुटणारा आरोपी अखेर ‘जेरबंद’

तांदुळवाडी एलसी लेक परिसरातील घटना; बारामती तालुका पोलिसांचा सापळा ठरला भारी

  तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
दि. १६ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास पुलकुंडवार (बदलेले नाव) (वय २२, रा. मार्केटयार्ड, बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रूमाल बांधून त्यांच्यावर हल्ला चढवला. यातील एका आरोपीने देवराज यांना मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली. त्यांनी विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने देवराज यांच्याकडील २,५०० रुपये रोख रक्कम व पोको कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्यांच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैनही काढून घेतली.एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अजय नंदकुमार सकट (रा.तांदुळवाडी, ता.बारामती) याला दि. १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची ४.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ,भारत खारतोडे मनोज पवार,नितीन ढवाण,निलेश वाकळे आणि राजू बन्ने,शाहरुख शेख यांच्या पथकाने केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page