अधिवेशन News : नाशिकमध्ये २३ जानेवारीला ठाकरे गटाचे महाअधिवेशन

Photo of author

By Sandhya

अधिवेशन

नाशिकमध्ये १९९५मध्ये घेतलेल्या महाअधिवेशनानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. बदलत्या राजकारणात पुन्हा सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी ठाकरे गटाने एकदिवसीय महाअधिवेशनासाठी नाशिकचीच निवड केली आहे.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी नाशकात ठाकरे गटाचे महाअधिवेशन भरविले जाणार असून याच दिवशी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

अवकाळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी खा. राऊत आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊत यांनी नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकमध्ये जानेवारीत आयोजित केल्या जाणाऱ्या महाअधिवेशनाची माहिती दिली. खा. राऊत म्हणाले की, या महाअधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न, वाढती महागाई, आदी प्रश्नांवर मंथन केले जाणार असून पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी धोरण ठरविले जाणार आहे.

या महाअधिवेशास पक्षप्रमुख ठाकरेंसह ठाकरे गटाचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी राऊत यांनी सांगीतले. त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे हे अधिवेशन भरविले जाणार असून दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात विविध ठराव मंजूर केले जाणार आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पक्षाची भूमिकाही या अधिवेशात निश्चित केली जाणार आहे. सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेने अधिवेशनाचा समारोप केला जाणार असल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

Leave a Comment