आदित्य ठाकरे : घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्याबोळ…

Photo of author

By Sandhya

आदित्य ठाकरे

पुणे शहरामध्ये शनिवारपासून (दि. ८) पावसाला सुरुवात झाली, पण या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि परिसराची अक्षरशः दैना उडाली. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती.

शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शहरातील ही अवस्था पाहून पुणे महापालिकेने केलेल्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली.

स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस झाला की, ठिकठिकाणी ड्रेनेजलाइन तुंबली जाते. पूरस्थिती निर्माण होते.

परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. साधारणपणे २०१९ पासून शहरात तुंबई होत असल्याचा अनुभव येत आहे. आंबिल ओढ्याला पूर आला तेव्हापासून नागरिकांना या पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खरंतर पुण्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. कमी वेळेत शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडत आहे. परिणामी, सिमेंटच्या रस्त्यांवर लगेच पाण्याचा डोह साठतो. या पाण्याला जाण्यासाठी योग्य रस्ताच देण्यात आलेला नाही.

अनेक ठिकाणचे ड्रेनेज बुजलेले आहेत, नाले बुजलेले आहेत. त्यामुळे पाणी थेट रस्त्यांवर येते. सखल भागात हे पाणी जाऊन साचते. म्हणूनच पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

आदित्य ठाकरेंनी या पावसानंतर ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपाच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील पायाभूत सुविधांचा बट्याबोळ केलेला आहे अशी टीका त्यांनी केलीये. ‘रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन’ असो, वेताळ टेकडीची लावलेली वाट असो, की नालेसफाईतला घोळ असो.,

पहिल्या पावसातच जर पाणी तुंबायला लागलं असेल आणि जनजीवन विस्कळीत होत असेल तर ते पुण्यासाठी धोकादायक आहे. चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक झालेलं आहे असं ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Comment