सुरेश धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत परखड मत मांडलं

Photo of author

By Sandhya


आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी काल एक वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन परखडपणे आपलं मत मांडलं.
“आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. काल नाही, दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला. शांतता ही माझी मूक संमती नाही” हे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी स्पष्ट केलंय. काल बीड जिल्ह्याती आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं सुरेश धस म्हणाले होते.
“माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, कलाकार यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्याचा मीडिया हजारो व्हिडीओ करून जातो. तेवढेच शब्द पकडतो. त्यावरून युट्यूब चॅनलवर हजार व्हिडीओ बनतात. त्यावर सेलिब्रिटिला बोलणं भाग पाडलं जातं” अशी खंत प्राजक्ता माळीने बोलून दाखवली.
“मग ती व्यक्ती बोलते. मग दुसऱ्या व्यक्तीला वाटतं आपण बोललंच पाहिजे. मग ती बोलते. पुन्हा दुसरी व्यक्ती बोलते. आता नाही बोलली. का गप्प बसली. मग बोलणं क्रमप्राप्त होते. ही चिखल फेक सुरू राहते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. सर्व समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही” असं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं.

Leave a Comment