
परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली.
परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली. तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.
परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे त्यांनी ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कशामुळे?
एका मनोरूग्णाने 10 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा रेल्वे स्थानकाजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. त्यानंतर शहरात हिंसाचार उसळला. घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली. त्यादरम्यान आक्रमक तरुणांनी वाहनांची, दुकानांची तोडफोड केली. घटनेच्या दोन दिवसानंतर पोलीसांनी 12 डिसेंबर रोजी सोमनाथ याच्यासह 300 लोकांना ताब्यात घेतले होते. तर 72 तासानंतर न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर सूर्यवंशीने छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सूर्यवंशीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.