पुण्यात कधी, कोण, काय करील याचा नेम नाही. एका बायकोच्या दिवाण्याने ती नांदायला आली नाही तर चक्क बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिलीय. पुणे पोलिसांनी या प्रकणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कौटुंबिक कलहसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे पुणं म्हटलं तर काहीतरी आगळीक असणारच, असं जणू समीकरणच झालंय.
मागे एका कुटुंबामध्ये चिकनसाठी राडा झाला होता. आईने आणि मुलींनी मिळून बापाला चोपून काढला होता. किरकोळ कारणावरुन बाऊ करण्याचे प्रकार पुण्यामध्ये घडत असतात. आतादेखील असाच एक प्रकार पुढे येतोय.
बायको नांदण्यासाठी परत नाही आली तर पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी तिच्या पतीने दिली आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला असा फोन आल्याने एकच खळबळ उडाली.
पुण्यात सात ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी फोनमधून देण्यात आली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून धमकी देणाराचा शोध सुरु आहे.