अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यापासून लांब जाऊन वेगळी चूल मांडली आणि तेव्हा पासून एकच चर्चा आहे ती अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याची. अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे खरी. पण त्यांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते यांना त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसलेले पाहण्याची इच्छा आहे.
आज पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना अखेर पत्रकारांनी हा प्रश्न विचारलाच, त्यांना मुख्यमंत्री होण्याबाबत छेडलं असता ते म्हणतात, ‘ मी मुख्यमंत्री होणार किंवा त्या शर्यतीत आहे याबाबतच कोणतही वृत्त खरं नाही. सध्या माझ्या डोक्यात फक्त विकसबाबतचे विचार सुरू आहेत. ‘
कार्यकर्त्यांची इच्छा.. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची मात्र तीव्र इच्छा आहे. पुण्यातील एका कार्यकर्त्याने गणेशोत्सवात अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत असा देखावाही उभा केला होता.
तर नुकतीच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असली; तरी आम्ही वास्तववादी आहोत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते पुण्यातील मानाच्या गणपतींची भेट घेतील. यावेळी आज होणाऱ्या आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत काय वाटतं हे विचारलं असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जो निर्णय देतील तो मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.