लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एक महिन्यात तयार करावा, या प्रकल्पासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,
असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, गणेशोत्सवात उपमुख्यमंत्री पवार यांनी मावळच्या जनतेसाठी मोठे गिफ्ट दिले असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर,
नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे. वार्याचा वेग लक्षात घेऊन आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे.
पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीटऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी.
परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाच्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. सत्तेत आले आणि मंजुरी मिळाली ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (11 मार्च 2022) लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती.
त्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार हे सत्तेत सहभागी झाले आणि अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
मावळातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, एम्फी थिएटर, खुली जीम आणि विविध खेळ इ. सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.