विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा मुद्दा तापला आहे. काल विधान परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर प्रसाद लाड बोलत होते. त्यावेळी अंबादास दानवे यांनी त्यांना शिवीगाळ केली होती.
दरम्यान, शिवराळ भाषा वापरणे अंबादास दानवे यांना महागात पडले आहे. त्यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याने अशा शिवराळ भाषेचा प्रयोग करणे शोभादायक नाही.
हे खपवून घेतले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे निलंबन करावे, अशी आमची मागणी असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, शिवीगाळ करणे योग्य नाही. असे अपशब्द वापरणाऱ्याचे निलंबन करायला हवे, हे शहाणपण गिरीश महाजन यांना तेव्हा का सुचले नाही,
जेव्हा रमेश बिधुडी नावाचा खासदार दानिश अली यांच्याबद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता किंवा संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसे महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती, असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटल्याचे पाहायला मिळाले. आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले होते.
यावेळी अंबादास दानवे बोलायला उभे राहिले असता, प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे पाहून काहीतरी हातवारे केले. त्यामुळे दानवे संतप्त झाले आणि त्यांनी थेट प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.
त्यावर अंबादास दानवे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सभागृह चालायला देणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवेंवर कारवाई करण्याची मागणी केली.