अमित शहा : काँग्रेस, पवारांची व्होट बँक आता उध्दव यांचीही…

Photo of author

By Sandhya

अमित शहा

राहुल गांधी यांच्या काँग्रेसची आणि शरद पवारांची व्होट बँक आता नकली शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचीही व्होट बँक बनली आहे. ठाकरे आता पाकिस्तानचा विरोध करणार नाहीत आणि काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्याची भाषाही करणार नाहीत, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील प्रचार सभेत केला.

भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ येथे त्यांची सभा झाली. सभेत शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकला कायद्याने बंदी आणली.

‘पीएफआय’वर बंदी घातली. मी नकली शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे प्रश्न विचारतो की, महाराष्ट्राच्या जनतेला सीएए हवे की नको?, ‘पीएफआय’वरील बंदी, राममंदिर उभारणी, तिहेरी तलाकवरील बंदी हे चांगले केले की वाईट केले? पण या सर्वांचे उत्तर आता ठाकरे देणार नाहीत.

ठाकरे यांची आता नवीन व्होट बँक झाली आहे. शहा म्हणाले, एका बाजूला ‘व्होट फॉर जिहाद’ आणि दुसर्‍या बाजूला ‘व्होट फॉर विकास’ आहे. एका बाजूला राहुल गांधी यांची चायनीज गॅरंटी, तर दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी यांची भारतीय गॅरंटी आहे. या दोन्हींपैकी कोणाला निवडणार आहात? संजय पाटील यांना मत म्हणजे मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीचे मत होय.

भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविणे, काश्मीरसह देशाला सुरक्षित बनविण्याचे काम हे मत करणार आहे. हे मत गरिबांचे जीवन उजळून टाकेल. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या फेरीअखेर शंभराहून अधिक जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तिसर्‍या टप्प्यात ‘चारसौ पार’च्या दिशेने मजबूत पावले टाकली आहेत.

शहा म्हणाले, प्रभू रामाच्या जन्मभूमीचा विषय काँग्रेसने 70 वर्षे लटकवत ठेवला. नरेंद्र मोदी यांनी मात्र पंतप्रधान पदाच्या दुसर्‍या कारकीर्दीतच श्रीरामाच्या जन्मभूमीत भव्यदिव्य राममंदिर बनविले.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासोबत लोक राहणार नाहीत. काशी विश्वनाथ मंदिर, बद्रिधाम, केदारधामचा दरबार सजविण्याचे कामही नरेंद्र मोदी करत आहेत.

Leave a Comment