कमी वेळेत अधिक पाऊस होऊन शहरात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शहरी पूरनियंत्रण आराखडा राबविणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ दत्तवाडी, राजेंद्रनगर, सेनादत्त पोलिस चौकी, नवी पेठ, टिळक रस्ता, रामबाग कॉलनी, साने गुरुजीनगर, पर्वतीगाव, लक्ष्मीनगर, सातारा रस्ता परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, सरस्वती शेंडगे, राजेंद्र काकडे, अमित कंक, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, संजय देशमुख, छगन बुलाखे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, राजाभाऊ भिलारे, गणेश भोकरे, नीलेश हांडे, हेमंत जगताप, रवी साने, कपिल जगताप, नीलेश धुमाळ उपस्थित होते.
या वेळी मोहोळ म्हणाले, शहरी पूरनियंत्रण योजनेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. मी महापौर असताना पुणे महापालिकेने यासंदर्भातला आराखडा केंद्र सरकारकडे सुपूर्त केला होता. त्या आराखड्याला मान्यता मिळाली असून, शहराच्या विविध भागांमध्ये 250 कोटी रुपयांची पूरनियंत्रणासाठी कामे होणार आहेत.
मोहोळ पुढे म्हणाले, पुराच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सेन्सर्स बसविणे, धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसविणे, पाणी टेकड्यांवर जिरवण्यासाठी उपाय करणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्यांचे ड्रोनमॅपिंग करणे, गटारांची क्षमता वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन करणे, गॅबियन वॉल उभारणे, कमांड कंट्रोल रूम उभारणे, अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत.
पाच वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या सोसायट्या आणि नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.