राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. यावर आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांसमोर आमोल कोल्हे यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. यावरूनच पत्रकार परिषदेत ‘पंतप्रधानांच्या कौतुकानंतर तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून ऑफर आहे का’? असा प्रश्न विचारला.
यावर अमोल कोल्हे यांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिले. अमोल कोल्हे थेट पत्रकालाच म्हणाले की, “तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही तिकडे जाणार का? असे असते का?” त्यावर पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, “पंतप्रधान मोदींनी तुमचं कौतुक केलं आहे ही ऑफर नाही का?” त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “पंतप्रधानांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही, कोण म्हणतं ही ऑफर आहे? मुळात ऑफर तर यायला हव्यात.”
पुढे अमोल कोल्हेंनी स्पष्ट सांगितले की, “सध्या ऑफर एकच आहे, ‘शिवपुत्र संभाजी’ हे नाटक पाहायला येणे ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, राजकीय पदं या गोष्टी केवळ पाच वर्षांसाठी असतात.
परंतु शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे लोकांच्या, लहान मुलांच्या काळजावर जे कोरलं जाणार आहे ते जास्त शास्वत आहे.” दरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य सध्या राज्यात चांगलेच गाजत आहे. राज्यभर या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. यासाठी अमोल कोल्हे यांनी खूप मेहनत केली आहे. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या या नाटकला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.