आग्रा महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत किरण सोमनाथ मोरे (३९, रा. भाटगाव) यांनी वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
मृताचे नाव निवृत्ती त्र्यंबक मोरे (५६, रा. भाटगाव) असे आहे. ते दुचाकीने (क्र. एमएच 15, एचआर ३५८५) चांदवडकडून नाशिककडे जाताना भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना धडक दिली. यात मोरे यांच्या डोक्याला, हाताला जबर मार लागला. यावेळी सोग्रसचे पोलिसपाटील राजेश गांगुर्डे यांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिसनाईक एस. आर. माळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मृत निवृत्ती मोरे हे चांदवड तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अव्वल लिपिक दिलीप मोरे यांचे मोठे बंधू व ज्येष्ठ वकील शांताराम जाधव यांचे व्याही होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.