पैठण तालुक्यातील फारोळा येथे अनैतिक संबंधातून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. कनकोर टाबर चव्हाण (वय ४०, रा. म्हारोळा, ता. पैठण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद बिडकीन पोलिसांत झाली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. विश्राम कौतुकराव गाडे, रा. फारोळा, असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारोळा येथे शनिवारी रात्री कनकोर चव्हाण हा घरावर काम करत असताना पडल्याचा बनाव करून बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
ही माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश सुरासे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल, पोना विष्णू गायकवाड, पोना शिवानंद बनगे, मेजर सुनील कानडे, अमोल सोनवणे या पथकासह शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी व्यक्तीची पाहणी केली. परंतु कनकोर याच्या डोक्याला जखम झाली होती.
इतर कुठेही जखम नसल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी विश्राम गाडे याला संशयावरून ताब्यात घेतले.
त्याचे ज्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्याच महिलेसोबत कनकोर यानेही अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून त्याचा खून केल्याची कबुली विश्राम याने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.