पूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर नांदापूर रेल्वेस्थानकाजवळ नांदेड-श्रीगंगानगर या एक्सप्रेस रेल्वेच्या एसी कोचच्या डब्याखालून धुर निघत असल्याने प्रवाशांमधून खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे थांबवून किरकोळ दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर रेल्वे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली. या घटनेबाबत रेल्वे विभागाच्या अधिकार्यांकडे कोणतीच माहिती नव्हती. तर जनसंपर्क अधिकार्यांनी फोन घेतलाच नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार झाला होता याची माहिती मिळू शकली नाही.
नांदेड-श्रीगंगानगर ही रेल्वे नेहमी प्रमाणे रविवारी (दि. १६) सकाळी ११ वाजून ७ मिनीटांनी नांदेड येथून निघाली होती. बोल्डा ते हिंगोली रेल्वे मार्गावर नांदापूर रेल्वेस्थानकापुढे आली रेल्वे पोहोचली.
दरम्यान बी-2 या एसी कोच डब्याच्या खालच्या बाजूस धूर निघू लागल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती चालकापर्यंत पोहोचविल्यानंतर तातडीने रेल्वे थांबविण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले.
चालक व इतर कर्मचार्यांनी या कोचच्या खालील बाजूला पाहणी केली. पंंधरा ते वीस मिनिटांनी दुरुस्ती केली अणि रेल्वे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली. रेल्वे पुढील प्रवासाला निघाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेची रेल्वे विभागाच्या अधिकार्यांना खबरही नव्हती.
रेल्वेच्या नांदेड कार्यालयातील अधिकार्यांशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. तर रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी नेहमी प्रमाणे दुरध्वनीच घेतला नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही माहिती घेता आली नाही.
या संदर्भात हिंगोली रेल्वे स्थानकाचे अधिकारी मिना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना देखील या घटनेबाबत अधिकृत माहिती देता आली नाही. मात्र काही प्रवाशांनी या संदर्भात माहिती दिली. रेल्वेचा ब्रेक लागल्यामुळे धुर निघाला असावा अशी शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.