मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. यावर आता उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना थेट शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे.
शिवतारे हे इंदापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवतारे म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. कारण तिकडे जे चाललं होतं ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले.”
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, अजित पवार भाजपमध्ये गेल्यावर कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवारांना खुली ऑफरचं दिली. यावेळी शिवतारे यांनी अजित पवार पक्ष सोडायची मी वाट बघत असल्याचेही सांगितले.
दरम्यान, विजय शिवतारे हे दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील खांडज येथील दूषित नीरा नदीची पाहणी केली. तसेच कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याने कारखान्याच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाला हे पाणी लवकर थांबविण्याची शिवतारे यांनी विनंती केली. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.