


कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिम भागातून जाणारा अष्टविनायक महामार्ग गतिमान झाल्याने मृत्यूचा सापळा बनताना दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच कवठे येमाईच्या इचकेवाडी जवळ झालेल्या अपघात दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवार दि. ०७ ला रात्री आठच्या दरम्यान दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे रस्त्याने वाहने त्यातल्या त्यात दुचाकी चालवताना योग्य त्या सुरक्षा कवचासह चालकांनी खूपच सावधानता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या अपघाताबाबत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार शरद वारे यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार पिंपरखेड ता.शिरूर येथील २५ वर्षीय तरुण आदिनाथ गोपाळ जाधव रा.पिंपरखेड ता.शिरूर हा रांजणगाव गणपती येथील मेडिकल दुकान बंद करून दुचाकीवरून आपली दुचाकी गाडी नंबर एम एच १२ एक्स जे ४३०७ यावर पिंपरखेड येथे चाललेला असताना रात्री आठच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई येथील हिलाळ (फासे वस्ती) नजीक याच रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या झालेल्या धडकेत जागेवरच ठार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या गतिमान झालेल्या महामार्गावर धोकेदायक ठरणाऱ्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत