आपल्या देशाच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनेक महिनांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या “वंदे माँ भारती” या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल अजय सिंह यांच्या हस्ते 5 मे 24 रोजी झाले.
प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे या गीताचे मूळ गायक आहेत. ब्रिगेडियर बिक्रमजीत सिंग, सुभाष सहगल आणि करण मस्ताना यांच्या या पदरचनेला मंत्रमुग्ध करणारे संगीत संयोजन रणजीत बारोट यांचे आहे. तर या गीताचे व्हिडिओ संपादन अतुल चौहान, अवध नारायण सिंह, ब्रिगेडियर बिक्रमजीत, सुभाष सहगल आणि लेफ्टनंट कर्नल संदीप लेघा यांनी केले आहे.
प्रत्येक स्वर आणि भाव अतिशय उत्कटतेने आणि सर्जनशीलतेने मांडणारे हे गीत म्हणजे दक्षिण कमांडच्या सामूहिक मुल्ये आणि उत्कृष्टतेच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे.
परिश्रमपूर्वक संशोधन आणि सातत्यपूर्ण अभिजातता राखत, संगीतकारांनी ऐतिहासिक भान जागवत सुरांनी ओतप्रोत अशा निनादणाऱ्या स्वरलयी गुंफल्या आहेत ज्या सर्व स्तरावर आणि कुटुंबांमध्ये वैश्विक भावना जागृत करतात.
या गीताचे अनावरण हा केवळ दक्षिण कमांडच्या गौरवशाली भूतकाळाचा सोहोळा नव्हता, तर कमांडचा वारसा पुढच्या पिढी साठी ठेवताना कमांडच्या उत्कटतेची, एकतेची आणि चिरकालीन दृष्टिकोनाची ही प्रचिती आहे.