अरविंद केजरीवाल : “भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवले, आता पुढचा नंबर…” 

Photo of author

By Sandhya

अरविंद केजरीवाल

मुंबईमध्ये २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीकास्र सोडले. यावेळी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.

पंतप्रधान मोदी एका गूप्त मोहिमेवर काम करत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. “एक देश, एक नेता”, ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न झालाय.

लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांनाही संपविण्याचा प्रयत्न चालवलाय, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी या सभेत केला.

“मी थेट तुरुंगातून आलोय. आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती.

पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. आमचेच उदाहरण घ्या. दिल्ली विधानसभेच्या २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६० हून अधिक जागा मिळाल्या. आम्हाला पराभूत करता येत नाही, म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटले.

पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखविले. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू”, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिले. केजरीवाल पुढे म्हणाले, २ जून रोजी मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार, असे सत्ताधारी सांगत आहेत.

पण माझे मतदारांना आवाहन आहे. तुम्ही जर इंडिया आघाडीला विजयी केले. आमचे सरकार बनविले, तर मला तुरुंगात जावे लागणार नाही.

पण तुम्ही कमळाचे बटन दाबले तर मला तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं मी तुरुंगात जावं, त्यांनी कमळाचे बटन दाबावे. ज्यांना वाटते मी स्वतंत्र राहावे, त्यांनी इंडिया आघाडीला जिंकून द्यावे.

Leave a Comment