Ashatai’s death marks the end of a golden era in the world of music – Protocol Minister Jayakumar Rawal

Photo of author

By Sandhya

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत -राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

        मुंबई ( दै. संध्या ) : ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भाषांतील बारा हजारांहून अधिक गीतांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

त्यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रती असलेल्या समर्पित निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार, आणि बांगला भूषण अशा विविध प्रतिष्ठित सन्मानांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली, असेही मंत्री श्री. रावल यांनी म्हटले आहे.

स्व. आशाताई यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे योगदान, समर्पण आणि त्यांची अजरामर गीते भारतीय संगीताच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील, यात शंका नाही. दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना हे दुःख सहन करण्याची प्रभू शक्ती देवो , अशी प्रार्थना मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page