उत्तराखंडमधील ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगाव दरम्यानच्या निर्माणाधीन बोगद्याचा भाग काल कोसळला होता. त्याखाली ४० कामगार अडकले असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत,
दरम्यान, या अडकलेल्या ४० कामगारांशी आज संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून सध्या त्यांना पाईपमधून अन्न, पाणी पुरवलं जात असून ऑक्सिजनचाही पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बचावकार्य १५ मीटर पोहोचले असून अजूनही ३५ मीटरचे काम शिल्लक असल्याची माहिती उत्तरकाशीचे मंडळ अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे.
रविवारी सकाळी ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगाव दरम्यानच्या बांधकामाधीन बोगद्यात ही दुर्घटना घडली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून बोगद्याच्या कोसळलेल्या भागात प्राणवायू नलिका टाकण्यात आल्या आहेत. तसेच कामगारांपर्यंत अन्नपदार्थही पाठवले जात आहेत.
बोगद्याच्या वरील बाजूचा सुमारे ५०-६० मीटर भाग कोसळला असून तो बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचाव पथकांतील सुमारे १६० जवान विविध साधनांच्या सहाय्याने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती उत्तरकाशी जिल्हा आपत्कालीन केंद्राने दिली.
कमांडिंग ऑफिसर नमन नरुला आणि सहायक कमांडंट जाधव वैभव यांच्या नेतृत्वाखालील ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ आणि ‘इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस’ (आयटीबीपी) पथकेही बचावकार्यात सहभागी झाली आहेत.
दुर्घटना कशी घडली आणि याला जबाबदार कोण यापेक्षाही सध्या आम्ही अडकलेल्या कामगारांचा जीव वाचवण्यास प्राधान्य देत आहोत, असे उत्तरकाशीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
गेल्या २४ हून अधिक तासांपासून बचावकार्य चालू आहे. तसंच, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने केला जात आहे.
लवकरात लवकर त्यांना बाहेर काढलं जाईल, अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हा आपत्तीव्यवस्थापक अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी दिली.