विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमक्यांचे फोन आणि मेसेज आले आहेत.
ही माहिती वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळं त्यांना धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या जरांगे-पाटील यांच्या मागणीला विरोध केला होता.
जरांगे-पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका विधानसभेतील विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी केली होती. जरांगे-पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांना धमकीचा फोन आणि मेसेज आला आहे.
सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा, तीन पोलीस आणि एक गाडी वडेट्टीवारांच्या सुरक्षेत आहे. पण आणखी सुरक्षा वाढविण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी देण्यात आली होती.
ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये, असे वक्तव्य केल्यानं त्यांच्याविरोधात मराठा आंदोलकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्यांना धमकीचा फोन आला होता. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे.
अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या घरावर गाड्यांवर जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. यातच आता वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आल्याने त्यांनी सुरक्षितेत वाढ करण्याची मागणी केली आहे.