BIG NEWS : अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे  

Photo of author

By Sandhya

अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष असून आपल्या गटाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मंगळवारी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांची निवड केली.  या निवडीने जिल्ह्यातील दादा गटात उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातही नाट्यमय घडामोडी घडल्या. आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी अजित पवार गटाचे शिवधनुष्य पेलल्यानंतर सातारा जिल्ह्यात अजितदादा गटाला खर्‍या अर्थाने पॉवर आली.

या जिल्ह्यावर ना. अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले असून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

आ. रामराजे ना. निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांच्या साथीने सातारा जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढू लागली आहे. संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासारखा आक्रमक व अभ्यासू चेहरा जिल्हाध्यक्षपदी निवडल्याने या गटाची बांधणी आणखी मजबूत होणार आहे.

संजीवराजे ना. निंबाळकर यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती याबरोबरच अनेक पदांवर आपला ठसा उमटवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत ते विधानसभेपर्यंत आ. रामराजे ना. निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे.  फलटण मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यावर आ. रामराजे यांची मजबूत पकड आहे.

संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीमुळे अजित पवार गटाला होणार आहे. फलटण तालुक्यासह जिल्ह्यात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची दखल घेण्यात आल्याचे या निवडीवरून दिसत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) वाढवण्याची जबाबदारी ना.अजित पवार यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सोपवली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने फलटण शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात जल्लोष करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment