
पुण्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांकडून तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते.
त्यासाठी पोलीसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या पाटील याला अटक करण्यात आलं आहे. यानंतर ललित पाटील याला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाईल.
प्रकरण काय आहे? पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते.याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झासा होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ललित पाटील फरार झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.
ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.
पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.