BIG NEWS : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग होणार आठ पदरी

Photo of author

By Sandhya

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग होणार आठ पदरी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहनांची वाढलेली संख्या तसेच पुढील काळात नवी मुंबई येथे होणारे विमानतळ यामुळे आणखी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन, या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक-एक मार्गिका (लेन) वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. यामुळे सध्याचा सहापदरी द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचे नाव यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग या नावाने ओळखला जातो. हा देशातील सर्वांत पहिला द्रुतगती महामार्ग असून, पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला.

हा महामार्ग कार्यान्वित होऊन आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या वीस वर्षांच्या कालावधीत या महामार्गाचा वापर करणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची दैनंदिन क्षमता साठ हजार आहे. मात्र, सध्या दिवसाला ऐंशी हजारांहून अधिक वाहने या रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळेच घाटात कायमच वाहतूक कोंडी होते.

पुणे-मुंबईदरम्यानच्या प्रवाशांची आणि वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment