
इंद्रायणी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह; आळंदीत खळबळ
तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरात इंद्रायणी नदीपात्रात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने बुधवारी सायंकाळी परिसरात मोठी खळबळ उडाली. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांना नदीपात्रात काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता दोन महिलांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नागरिकांनी तातडीने आळंदी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
घटनास्थळी पाहणी करताना या दोन्ही महिलांनी साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट बांधून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोघींनी एकत्रितपणे नदीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृतांपैकी एका महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे, तर दुसऱ्या महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे असल्याचे समोर आले आहे. या महिला नेमक्या कोण, तसेच त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या महिला माय-लेकी आहेत की नातेवाईक, याचा तपास आळंदी पोलीस करीत असून, परिसरातून कोणी बेपत्ता असल्याची नोंद आहे का याचीही पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.