लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपने विधानसभेमध्ये ८० ते ९० जागा राष्ट्रवादीला देण्याचा शब्द दिलाय, असा दावा त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘योग्य तो वाटा आपल्याला महायुतीमध्ये मिळायला पाहिजे.
आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की ८० ते ९० जागा मिळतील. यावेळी जी खटपट झाली ती खटपट पाहता ही खटपट पुढे होता कामा नये. इतक्या जागा पाहिजेत असं आपल्याला त्यांना सांगावं लागेल.’
भाजपला ८० ते ९० जागा सांगितलं तरच आपल्या ५० ते ६० जागा निवडून येणार. पण, आता तुमच्याकडे ५० आहेत मग ५० घ्या म्हटलं की अजून खाली येण्याचं काम होईल. तसं होताच कामा नये. त्यामुळे त्यांना आताच सांगून टाका. आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.