राजकारण हे इच्छेवर चालत नसून परिस्थितीवर चालते. त्यामुळे परिस्थिती पाहून अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ( दि.२१) अमरावती येथे दिली.
एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची अमरावती लोकसभेत कमळ चिन्हाची मागणी आहे तर दुसरीकडे एनडीए चे घटक असलेल्या राणादांपत्याने ही जागा आपल्याला सोडावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावरून चंद्रकांत पाटील माध्यमांना उत्तर देत होते.
वर्षानुवर्ष पक्ष वाढविण्यासाठी काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची कमळ चिन्हाची इच्छा स्वभाविक आहे. त्याचप्रमाणे आमच्या सोबत असलेल्या राणा यांची इच्छा बरोबर आहे.
मात्र जागे संदर्भात निर्णय दिल्ली येथील पक्षश्रेष्ठी घेतील तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील. भाजपमध्ये पक्ष शिस्त पाळली जाते असे ते म्हणाले.
खासदार नवनीत राणा या सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे उघड समर्थन करत असतात. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये कधी प्रवेश करणार ? या वर बोलताना पाटील यांनी हा प्रश्न तुम्ही राणा यांनाच विचारा असे ते म्हणाले.