‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते.