भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील. तसेच, नेत्यांसोबत पक्षात येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी, रोजी जाहीर केले.
जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गटातील गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपमध्ये येणाऱ्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असे बावनकुळे म्हणाले. उल्हास पाटील इकडे येणार याची कुणकुण लागल्यावर काँग्रेसने त्यांना थेट पक्षातून निलंबित केले. काँग्रेसची ही कृती मग्रुरीची आहे.
उल्हास पाटील यांनी काँग्रेसची मोठी सेवा केली, आपली हयात घालवली. भाजपमध्ये जर कोणी असा नेता निघून जाण्याची खबर लागली असती तर माझ्यासह राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी अशा नेत्याची भेट घेतली असती.
त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले असते. हाच काँग्रेस आणि भाजपमधील फरक आहे. यावेळी बावनकुळे यांनी केतकी पाटील यांची भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
तर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उल्हास पाटील यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजप आणखी बळकट होईल. उत्तर महाराष्ट्रात यापुढील काळात आणखी पक्ष प्रवेश होतील, असेही महाजन यांनी नमूद केले.
जळगावातील पक्षप्रवेशासोबतच धुळे जिल्ह्यातील ६७ सरपंचांनी बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, बापजी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, अनिल कचवे आदींचा त्यात समावेश आहे.