दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र… असा नारा देत पुन्हा भाजप विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यापुढेही राज्याचे नेतृत्त्व करतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
लोकसभा निवडणूक निकालानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची चर्चा जोरात होती. दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज नागपुरात आल्यावर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत.
दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी ते म्हणाले की, ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला.
जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.