राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. दरम्यान आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. बुधवारी (दि.१९) ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लवकरच जरांगे आणि भुजबळ दोघांचीही आपण भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. जरांगे आणि भुजबळ यांनी एकत्र का आले पाहिजे ?
मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. मराठा – ओबीसी हा वाद आता शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. त्यामुळे जरांगे यांची मागणी रास्त आहे.
सगळे मराठे ओबीसी मध्ये आले, तर सध्या असलेल्या ओबीसीमध्ये अडचण निर्माण होईल, हा जो संशय आहे, तो देखील काही प्रमाणात वास्तविक आहे. मात्र, जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र येऊन दिल्ली समोर लढा उभारला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
ओबीसी मधील आरक्षणाचा कोटा कसा वाढविता येईल यासाठी लक्ष दिले पाहिजे. याकरिता मी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे देखील आमदार कडू यांनी सांगितले.