आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्याबाबतचा निर्णय केंद्रीय निवड समिती घेईल. खडसे यांची इच्छा असेल, तर आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. विकसित भारतासाठी आम्ही पक्षप्रवेश करत आहोत.
देवेंद्र फडणवीस यांचा खडसे यांना कधीही विरोध नव्हता, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना पुण्यात रविवारी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत आणि त्या उद्देशासाठी येणारे नेते यांंचे स्वागत आहेच. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, लातूरच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
खडसे यांचे भाजपमध्ये येण्याचे मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल. फडणवीस यांनी कायमच खडसे यांना मानाचे स्थान दिले, याचा मी साक्षीदार आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात बावनकुळे म्हणाले, जवळपास अर्ध्या तासात चर्चा होईल इतका अंतिम निर्णय झाला आहे.