चंद्रशेखर बावनकुळे : पंतप्रधान मोदी रेकॉर्डब्रेक विजय मिळवतील…

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. काश्मीरमधील 370 कलम हटवले. अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रश्न सोडवला. मोदी यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत आहे.

त्यामुळे 2024 मध्येही त्यांचा रेकार्डब्रेक विजय होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संपर्क ते समर्थन, या अभियानाच्या माध्यमातून बावनकुळे इचलकरंजीत आले होते.

यावेळी महात्मा गांधी पुतळा चौकात झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. मोदी यांचा विजयरथ थांबविण्यासाठी देशातील 28 राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. हिंदू संस्कृती संपवणार्‍या पक्षाशी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले धमक असेल तर युती तोडणार का? नाहीतर जनता बदला घेईल.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी करून जनतेने दिलेल्या बहुमताचा अपमान केला.

मात्र ठाकरे यांचे विचार, हिंदुत्वाचा गळा दाबला जात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि सरकारमध्ये बदल घडवून आणला असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

मोदी सरकारने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. या निर्णयामुळे संसदेत 191 महिला खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला आमदार असणार आहेत.

आत्मनिर्भर भारताचा संकल्प केल्यामुळेच अजित पवार यांनी मोदी आणि फडणवीस यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2014 आणि 2019 या निवडणुकीच्या तुलनेत मोदी रेकॉर्ड मोडून सत्तेत येतील. मोदी तिसर्‍यांदा शपथ घेतील, त्यावेळी इचलकरंजीतील खासदारांसह महाराष्ट्रातील 45 खासदार मोदींच्या समर्थनार्थ असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले. इचलकरंजीतून मोदी यांना मोठे समर्थन मिळत आहे. त्यामुळे 2024 चा जनादेशही मोदी यांच्या बाजूने असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पुण्याचे मुरलीधर मोहोळ, खा. धनंजय महाडिक, डॉ. संजय पाटील, अरुण इंगवले, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक स्वामी, जिल्हाध्यक्ष (पूर्व) राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, अशोकराव माने, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अनिल डाळ्या आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी अग्रसेन भवन येथे बावनकुळे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील वॉरियर्स यांची संवाद बैठक घेतली. बावनकुळे यांचा व्यापार्‍यांशीही संवाद कॉ. मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावरील व्यापार्‍यांशी बावनकुळे यांनी संवाद साधला.

यावेळी व्यापार्‍यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुस्लिम महिलांनी 370 कलम आणि एस. टी. बसमध्ये महिलांना 50 टक्के दरामध्ये सवलत दिल्याच्या निर्णयाच्या स्वागताचे फलक झळकवले.

जुन्या नगरपालिकेजवळ विश्वकर्मा योजनेचेही स्वागत करण्यात आले. यावेळी बारा बलुतेदारांनी आपापल्या व्यवसायांची प्रातिनिधिक स्वरूपात मांडणी केली होती.

934 पैकी 932 जणांचे मोदींना समर्थन आजच्या अभियानामध्ये 934 जणांना भेटलो. 932 जणांनी मोदींना समर्थन दिले. एकाने राहुल गांधी, तर दुसर्‍याने प्रकाश आंबेडकर यांना समर्थन दिले. त्यामुळे 98 टक्के नागरिकांना मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Leave a Comment