भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या ‘महेंद्रसिंग धोनी’ने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तेव्हा पासून धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही.
महेंद्र सिंग धोनी एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. मात्र, असं असलं तरी धोनी आयपीएल खेळत राहणार आहे. दरम्यान, 31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून, यंदाचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळण्यात आला होता.
मात्र, आता चेन्नई सुपर किंग्ज संघावर दुखावतीचे सावट आल्याचं दिसून येत आहेत. चेन्नईच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत ड्वेन ब्राव्हो, बेन स्टोक्स या आणि यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
त्यात आता आणखी मोठ्या खेळाडूची भर पडली आहे. चेन्नईचा कर्णधार म्हणजेच, महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नईचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने धोनीला दुखापत असल्याची माहिती दिली आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात बुधवारी 12 एप्रिल रोजी सामना पार पडला. चेन्नईचा या सामन्यात शेवटच्या बॉलवर पराभव झाला. यानंतर स्टीफन फ्लेमिंग याने धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली. धोनीला दुखापतीमुळे राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता. चेन्नईचा या सामन्यात पराभव तर झालाच. मात्र आता धोनीच्या या दुखापतीने टीम मॅनेजमेंटसह क्रिकेट चाहत्यांचंही टेन्शन वाढलंय.