चंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा भाजप मित्रपक्षांच्या बरोबरीने जिंकेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी बावनकुळे हे मंगळवारी फलटण येथे आले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

आमदार जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आदी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात प्रचंड कामे झाली आहेत.

विकासकामांबाबत देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नंबर लागतो. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे.

गोरगरिबांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्यात आल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनतेशी, कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्ष 45 पेक्षा अधिक जागा जिंकतील.

हा माझा शंभर टक्के दावा असून, जागावाटपाबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. खासदार रणजितसिंह यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात माढा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक निधी खेचून आणला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, इच्छुक असणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून आणि निवडून कोण येईल, याचा अंदाज घेऊनच कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपला अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. महाराष्ट्रातसुद्धा 45 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा पुनरुच्चार बावनकुळे यांनी केला.

Leave a Comment