राज्यात अकृषी महाविद्यालयातील सीएचबी अर्थात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांचे मानधन आणि पूर्णवेळ प्राध्यापकांचे शैक्षणिक वर्ष 2023 मधील वेतनातील फरक (थकबाकी) मार्च 2024 महिन्यात मिळणे अपेक्षित असते.
परंतु या वर्षी अनेक विभागातील सहसंचालक कार्यालयाकडून ते देण्यात आले नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे पत्र महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, राज्यात सध्या कुठलीच आपत्कालीन परिस्थिती नाही. दुष्काळ नाही, महामारी नाही मग सीएचबी प्राध्यापकांच्या घेतलेल्या हक्काच्या तासिकेत जाणीवपूर्वक कपात करूनसुद्धा मिळणारे मानधन शिक्षण विभाग वेळेत देत नाही.
राज्यात अकृषी महाविद्यालयात 50 टक्के प्राध्यापक काम करतात. बाकी 50 टक्के जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत. 100 टक्के वर्कलोड 50 टक्के प्राध्यापक पूर्ण करतात. किमान या प्राध्यापकांचे मानधन व थकबाकी तरी वेळेत देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे, चंद्रकांत पाटील राज्याचे एक वरिष्ठ व जबाबदार मंत्री आहेत.
परंतु शिक्षण विभागात जो अनागोंदी कारभार सुरू आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावे. राज्यात प्राध्यापक भरती व भरतीप्रक्रियाबद्दल कुठलेच सरकार संवेदनशील नाही.
100 टक्के भरती करायची नाही मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अपुर्या मनुष्यबळावर कशी होणार यावर सुद्धा विचार करण्याची गरज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.