क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून घातला २५ लाख रुपयांचा गंडा

Photo of author

By Sandhya

२५ लाख रुपयांचा गंडा

पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायाकरीता क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून भामट्याने शहरातील तरुणास २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्याच्या टेलिग्राम आयडीसह खासगी बँकेच्या खातेक्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पंचवटीतील अयोध्यानगरी परिसरातील २६ वर्षीय तरुण इंजिनिअर असून तो पुणे शहरात नोकरीस होता. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा अंतर्गत या तरुणाला सैन्यदलात नोकरी लागणार होती. तोपर्यंत व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला.

दरम्यान, २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भामट्याने टेलिग्रामवरुन तरुणाशी संपर्क साधत ऑनलाइन व्यवसायाची माहिती दिली. आर्थिक गुंतवणूक केल्यास परतावा मिळेल असे आमीष दाखवून भामट्याने तरुणास २४ लाख २५ हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

त्यानुसार तरुणाने भामट्याच्या विविध बँक खात्यांवर पैसे जमा केले होते. मात्र पैसे देऊनही व्यवसाय सुरू न झाल्याने तसेच अपेक्षित नफा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.

तक्रार अर्जानुसार तपास केल्यानंतर तरुणाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी भामट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख याप्रकरणी तपास करीत आहेत.

चार लाख रुपये गोठविले तरुणाने सायबर पोलिसांत तक्रार अर्ज दिला. त्यानुसार सायबर पोलिसांनी त्वरित संशयितांची ऑनलाइन माहिती व बँकेच्या खाते क्रमांकावरुन कारवाई केली. त्यामध्ये २४ लाखांपैकी संशयितांच्या बँक खात्यावर असलेले ४ लाख रुपये गोठविणे सायबर पोलिसांना शक्य झाले. 

Leave a Comment