देशात तयार झाले नवे आठ कोटी उद्योजक; मुद्रा योजनेवर पंतप्रधान मोदींचा दावा

Photo of author

By Sandhya

नोकरी मागणारे नव्हे; तर नोकरी देणारे व्हा…’ या एकाच मंत्रामुळे देशात “मुद्रा योजना’ यशस्वी झाली असून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे. या योजनेमुळे देशात आठ कोटी नवे उद्योजक तयार झाल्याचा दावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

दहा लाख तरुणांना नोकरी देण्याच्या मोहिमेतीअंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुमारे 71,000 तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी मोदी म्हणाले की, आज केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 70 हजाराहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. तुम्हा सर्व तरुणांचे, तुमच्या परिवारातील सदस्यांचे खूप खूप अभिनंदन.

आजचा न्यू इंडिया ज्या नवीन धोरण आणि रणनीतीचा अवलंब करत आहे, त्यामुळे देशात नवीन शक्‍यता आणि संधींची दारे खुली झाली आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोविडनंतर संपूर्ण जगाला मंदीचा सामना करावा लागत आहे, बहुतेक देशांची अर्थव्यवस्था सतत घसरत आहे.

असे असूनही, जग भारताकडे एक उज्ज्वल स्थान म्हणून पाहत आहे. एका अहवालानुसार, स्टार्टअप्सने 4 दशलक्षाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे ड्रोन क्षेत्र देखील आहे. गेल्या 8-9 वर्षात देशातील क्रीडा क्षेत्राने देखील उत्तम वाटचाल केली आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, आज तरुणांसमोर अशी अनेक क्षेत्रे खुली झाली आहेत, जी 10 वर्षांपूर्वी तरुणांना उपलब्ध नव्हती. आज आधुनिक उपग्रहांपासून ते सेमी हायस्पीड ट्रेन्सची निर्मिती फक्त भारतातच होत आहे. ‘आत्मनिर्भर भारत मोहिमे’चा विचार आणि दृष्टीकोन केवळ स्वदेशी आहे. भारतामध्ये खेड्यापासून शहरांपर्यंत कोट्यावधी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे हे अभियान आहे.

Leave a Comment