ड्रग्स कारवाई आणि दोन आठवडे बेपत्ता असलेले ललित पाटील यांच्याबाबतीत राज्य शासन गंभीर आहे. शेवटी जातील कुठे? शोधून काढू त्यांना. त्यांचे बाकी साथीदार बंधू मिळालेच, ते पण मिळतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अलिकडेच मी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हाच सर्व युनिट्सला सांगितले होते की, आता आपले टारगेट ड्रग्स आहे. त्यावर सर्वांनी कडक कारवाई केली पाहिजे.
सुरूवातीला मुंबईने कारवाई केली. आता हळूहळू सर्व युनिट्स कारवाई करीत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारचा पण फोकस आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात कमिटी बनविल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत या कमिट्या येतात. भविष्यातही अशा मोठ्या कारवाया होतच राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना व्हिडीओ बघणाऱ्या चालकाच्या व्हायरल व्हिडिओबद्दल छेडले असता इतरांच्या जीविताला धोका पोहचविणाऱ्या अशा ड्रायव्हरवर नक्कीच कारवाई केली जाईल. सोबतच या मार्गावर जाणीव जनजागृती केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आज एकाचवेळी भाजप, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्या बैठका होत आहेत. यासंदर्भात बोलताना मला फक्त आमच्या बैठकीच्या बाबतीत माहित आहे. अजून कोणी पक्ष बैठक घेत आहेत, त्याबद्दल मला माहिती नाही.
आमच्या ओबीसी आघाडीच्या बैठक नेहमी होत असतात. वरिष्ठ पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देताना मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सावध पवित्रा घेतला. मी त्यांचे पुस्तक वाचलेले नाही, मला कुठलीही माहिती नाही, असे ते म्हणाले.