पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश असलेली एक मोठी महायुती आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइं, मनसे, जनसुराज्य असे वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदींच्या नेतृत्वाखाली तयार केली आहे.
विरोधकांकडे 26 पक्षांची खिचडी आहे आणि त्या ठिकाणी कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही. आपली महायुती म्हणजे ही विकासाची गाडी आहे. या गाडीमध्ये बसल्यानंतर सब का साथ सब का विकास आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सावर्डे (ता. चंदगड) येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते. फडणवीस म्हणाले, मोदींच्या विकासाची गाडी वेगाने पुढे जात आहे.
विरोधी पक्षात मात्र प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. सगळेच इंजिन आहेत. आणि अशा गाडीत बसण्याची जागा ही सामान्य माणसाला नसते. त्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हर बसतो.
राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाची आणि प्रियांका यांना जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरिता जागा आहे. आणि पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियांकरिता जागा आहे, असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
फडणवीस म्हणाले, कोल्हापूर मतदारसंघाची बोगी तिथे मोदीजींच्या इंजिनला लागते. आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबवू शकत नाही. मोदींनी या दहा वर्षांत देशात परिवर्तन केले आहे. जगातील अर्थतज्ज्ञ मोदींच्या मॉडेलची चर्चा करतात.
शेकडो योजना केंद सरकारने गल्लीपर्यंत आणल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ही लढाई प्रतिष्ठेची लढाई आहे. संविधान बदलले जाणार नाही. काँग्रेसच्या प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसला चाळीस वर्षांत जमले नाही ते मोदींनी दहा वर्षांत करून दाखवले असल्याचे सांगितले.
मंत्री उदय सामंत यांनी आचारसंहिता संपताच विकासकामांना सुरुवात करू आणि हलकर्णीच्या एमआयडीसीमध्ये शेकडो उद्योग सुरू होतील. चंदगड मतदारसंघातील गडकोट व धार्मिक स्थळे यांच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर शाश्वत विकास देणारा खासदार निवडून द्या, डमी नको. चंदगड तालुक्याचा विकास कुणी केला, हे जनतेला माहिती आहे.
विकासासाठी बावड्याच्या भावड्याची गरज नसल्याचे आ. राजेश पाटील यांनी सांगितले, तर चंदगडमधून गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. यावेळी भरमूअण्णा पाटील, समरजित घाटगे, अनिता चौगले, जयश्री तेली, ज्योती पाटील आदींची भाषणे झाली.
यावेळी संग्राम कुपेकर, विकास महात्मे, काशिनाथ चराटी, अनिरुद्ध केसरकर, दीपक पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, हेमंत कोलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी केले.