देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; राज्यात कंत्राटी भरती जीआर रद्द…

Photo of author

By Sandhya

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; राज्यात कंत्राटी भरती जीआर रद्द

राज्यात कंत्राटी भरती करण्याच्या मुद्द्यावरून तरुणांमध्ये संतापाची भावना आहे. यावरून ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर आज रद्द करत असल्याची घोषणा केली.

ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य़ात काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने पहिल्यांदा कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सरकारकडून ६ हजार कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हा निर्णय पुढे कायम ठेवला होता.

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे आता विरोधकांनी युवकांची दिशाभूल करू नये. ठाकरे आणि पवारांनी आपले पाप आमच्या डोक्यावर मारू नये. युवकांची दिशाभूल केल्याप्रकऱणी ठाकरे आणि पवार माफी मागणार का ?, असा सवाल करून मविआचे पाप आमच्या माथी आम्ही घेणार नाही, असे स्पष्ट करत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

आपणच निर्णय घ्यायचा आणि त्याविरोधात आंदोलन करायचे हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करायला लाज कशी वाटत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तरुणांच्या मनात असंतोष पसरविला जात आहे.

Leave a Comment