Divisional Commissioner inspects Palkhi base in Saswad

Photo of author

By Sandhya

सासवडच्या पालखी तळाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

​सासवड: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे ११ जुलै रोजी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवड (ता. पुरंदर) नगरीत आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी गुरुवारी (ता.४) सासवड येथील पालखी तळाची आणि पालखी पाहणी केली.

​प्रशासनाच्या वतीने सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, जिल्हा परिषद सदस्य हरीभाऊ लोळे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर जगताप, स्मिता जगताप, लिना वढणे यांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

याप्रसंगी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांनी सासवडच्या वीर धरण पाणी योजनेच्या सातारा व पुणे जिल्ह्यातील भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने पाणी उपसा करण्यासाठी अडचणी येत असून पाणीपुरवठ्यासाठी सुरळीत विजपुरवठा व्हावा., तसेच कचरा व्यवस्थापनासाठी १५ नवीन घंटागाड्यांची उपलब्धता व्हावी याबाबत विभागीय आयुक्त शीतल तेली यांना निवेदन दिले. याबरोबरच संत सोपानदेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत गोसावी आणि चोपदार सिद्धेश शिंदे यांनी सासवडमधील संत सोपानकाका पालखी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी केली. याबरोबरच चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे विश्वस्त शशिकांत जगताप यांनी पालखी मार्गावरील खडकी ते शेटफळगढे आणि डाळज नं. १ ते डाळज नं. ३ च्या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली. यावर विभागीय आयुक्त शीतल तेली यांनी तिर्थक्षेत्र विकास मधून प्रस्ताव करण्याच्या सुचना दिल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page